घरी कितीही शेती असो, शिकलेली शेतकऱ्यांची मुलं नोकरीलाच पहिली पसंती देतात. याला फाटा देत जळगाव जिल्ह्यातील सम्राट शिंदेने इंजिनिअरची नोकरी सोडली आणि ते शेतीत उतरले. पारंपरिक पिकं सोडून त्यांनी अॅपल बेर या जातीच्या बोरीची लागवडकेली. जिथे १० हजार रुपयेही मिळत नव्हते तिथे यंदा त्यांना ८० हजारांचं उत्पन्न मिळालं आहे.जळगाव जिल्ह्यातील वळगाव टेकचे सम्राट शिंदे मुळचे इंजिनीयर. इंजिनीअरिंगच्या शिक्षणानंतर त्यांनी काही काळ नोकरीही केली. पण शहरातील नोकरीत त्यांचं मन रमत नव्हतं. मग ते गावाकडे आले आणि शेती करण्याचा निर्णय घेतला. स्वाभाविकच घरच्यांचा यासाठी विरोध होताच. पण मुलाचा आत्मविश्वास पाहून आई-वडिलांनी माघार घेतली. सम्राट यांनाही बळ मिळालं. त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने घरची १० एकर शेती कसायला सुरुवात केली. पारंपरिक पिकांच्या साथीला त्यांनी बोरांसारख्या पिकांची लागवडही सुरु केली.अॅपल बेरची शेतीसम्राट शिंदे यांची जमीन हलकी आहे, त्यांचे वडील या शेतीत पारंपरिक गहू, हरभरा आणि कापसासारखी पिकं घ्यायचे. पण या पिकांत फारसं काही मिळत नाही, हे सम्राट यांच्या लक्षात आलं होतं. म्हणूनच त्यांनी बोर लावण्याचं ठरवलं. त्यासाठी रोपं विकत आणली. दीड फूट खोलीचे खड्डे खणून त्यात एक पाटी शेणखत, नदीचा गाळ, अर्धा किलो सिंगल सुफर फॉस्फेट आणि १० ग्रॅम थायमेट टाकलं. जानेवारी २०१० ला त्यांनी एका एकरात लागवड केली. पंधरा दिवसांनी अळीच्या नियंत्रणासाठी त्यांनी क्विनॉलफॉस आणि बाविस्टीनची फवारणी केली. सोबत क्लोरोपायरीफॉस आणि एम-४५ चाही वापर केला.अॅपल बेर या जातीला वर्षातून दोन वेळा बहार येतो. या बोरीपासून पावसाळा आणि हिवाळ्यात उत्पादन मिळते. लागवडीनंतर सहा महिन्यांत सम्राट शिंदे यांच्या शेतातली बोर फुलोऱ्यावर आली. झाडांची पुरेसी वाढ व्हावीम्हणून त्यांनी पहिला बहार घेतला नाही. हिवाळ्यात येणाऱ्या दुसरा बहार त्यांनी घेतला. सध्या त्या बहाराच्या बोरांची काढणीसुरु आहे. एका एकरातून त्यांना दोन टन उत्पादन मिळणार आहे. सरासरी ४० रुपये किलोने ते बोरांची विक्री करतात. यातून १० हजारांचा खर्च वजा करता त्यांना ७० हजारांचा निव्वळ नफा मिळणार आहे. किरकोळ विक्रीमुळे त्यांना चांगला दर मिळाला आहे.सम्राट शिंदे यांच्या शेतातील बोरीच्या झाडांची वाढ सुरु आहे. पुढील हंगामात त्यांना यापासून जास्त उत्पन्न मिळणार आहे.पारंपरिक पिकांच्या तुलनेत त्यांना बोरीच्या पिकातून दुप्पटीपेक्षा जास्त उत्पन्न मिळालं आहे. पुढच्या वर्षी बोरीच्या क्षेत्र वाढवण्याचा त्यांचा विचार आहे.शिकल्यासवरल्यांनी नोकरी करायची आणि ज्यांनी काही पर्याय नाही त्यांनी शेतीत पडायचं, ग्रामिण भागात ही ठरलेली रीत. पण शिकलेल्या तरुणांनी आधुनिक पद्धतीने शेती केली तर यश मिळते. हेच सम्राट शिंदे यांनी दाखवून दिलं. आपल्या शेतीत सुधारणा होण्यासाठी आणि शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी अशाप्रकाच्या सम्राटची आज शेतीला खऱ्या अर्थाने गरज आहे.
No comments:
Post a Comment